कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक ऊबदार घरटं. जिथे जवळच्या नात्यातली माणसं प्रेमानं एकत्र राहतात. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. एकमेकांना साथ देतात, एकमेकांना स्वप्नपूर्तीसाठी बळ देतात. पण नुसतं शरीराने एकत्र राहणं म्हणजे कुटुंब नाही, मनाने एकात्म असणं म्हणजे खरं कुटुंब.

काही कुटुंबं  आनंदी का असतात याची कारणं  शोधली की स्पष्ट दिसतं की त्यांचं सहजीवन समृद्ध असतं. सर्व वयोगटातल्या कुटुंबीयांचा एकमेकांशी उत्तम सुसंवाद असतो. सकारात्मक, विश्वासाचं नातं असतं. वादविवाद, भाडणं होतात, नाही असं नाही, पण त्यांचं निराकरणही लगेच होतं. नकारात्मक दृष्टीकोनाला थारा नसतो,त्यामुळे प्रत्येक आव्हान पेलायला प्रत्येकाला सामर्थ्य मिळतं.

आज स्वतंत्र कुटुंब ही काळाची अपरिहार्यता असली तरीही एकत्र कुटुंबाची गोडी काही आगळीच! आई बाबा, आजी आजोबा, काका, काकू, सख्खी, चुलत भावंडं यांचा गोतावळा कसा धमाल आणतो. व्यक्तिमत्व विकासही सहज होतो. भावनिक बुद्ध्यांक वाढायलाही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. नकार पचवायची सवय प्रगल्भ करून जाते. नाती अगदी मुराम्ब्यासारखी मुरतात. मधासारखी गोड होतात.

एकत्र कुटुंब म्हणजे पायातल्या बेड्या हा विचार आज कालबाह्य होतो आहे. आजूबाजूला मोडलेली किंवा मोडकळीला आलेली कुटुंबं पाहिली की याची गरज अजूनच अधोरेखित होते आहे. सुनेच्या पाठीशी उभे असलेले सासूसासरे, नातवंडांकडून कॉम्प्यूटर शिकणारे आजोबा, व्हॉट्स अँप शिकणारी आजी हे चित्र कसं विलोभनीय वाटतं नाही?

म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाच्या एकसंध असण्यात योगदान दिलं पाहिजे. आपल्या माणसांची मनं जपायला हवीत. स्वप्नं फुलवायला हवीत. तरच आजच्या धकाधकीच्या युगात आपल्याला मिळेल एक आनंदाचं बेट… आपलं कुटुंब!

खूप सुंदर होते ते दिवस. वाड्यातले दिवस. सडा शिंपण्यात, रांगोळीच्या रेषात सकाळ उजाडायची. पूजेच्या प्रसन्न वातावरणात आरतीच्या सुरात उदबत्तीचा सुगंध दरवळायचा. नाती कशी सायीसारखी दाट होती. आणि शेजाèयापाजाèयांशी असलेले भावबंध खडीसाखरेसारखे मधुर. आख्खा वाडा जणू एका अदृश्य धाग्याने बांधलेला होता. एखाद्याच्या सुखात सगळा वाडा हसायचा, एखाद्याच्या दु:खात हळहळायचा. अशा वाड्याचं नावच पडायचं… बटाट्याची चाळ !!
वाडा आणि चाळ म्हणजे शेजारधर्माचं जणू प्रतीक. आज जाणवतं की आपण जिथे राहतो ते घर, आपले तिथले शेजारी आणि त्यांच्याबरोबरचं सहजीवन, यांचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत किती महत्वाचा वाटा असतो. आज प्रश्न पडतो, आपल्या मुलांना देऊ शकणार आहोत का आपण असा आनंदाचा मेवा, आठवणींचा ठेवा? त्यांच्याही भावविश्वात असेल का एखादा वाडा? त्यांनाही मिळेल का नात्यांचा असा अमूल्य वारसा?
अगदी मनापासून वाटतं, आपल्या मुलांना नुसती गॅजेट्स नाही माणसंही मिळाली पाहिजेत. मुक्यानं चॅटिंग करण्यापेक्षा भरभरून बोलायला, खळखळून हसायला स्वत:चे कट्टे पाहिजेत. दोस्त पाहिजेत. आशीर्वादासाठी वाकायला ज्येष्ठ पाहिजेत. निवांत विसावायला कुटुंब पाहिजे. नुसतं घर नाही, शेजार पाहिजे. नुसता शेजार नाही, संस्कृती पाहिजे. 
शेजारी आणि त्यांच्याबरोबर केलेली धमाल सांगायला शब्दही पुरत नाहीत. दिवाळीत एकमेकांच्या घरी जाणारी फराळाची ताटं, एकत्र उडवलेले फटाके, केलेला किल्ला. गणपतीची सजावट, आरती, प्रसाद, ढोलताशांच्या गजरातली विसर्जन मिरवणूक. संक्रांतीचं हळदीकुंकू, खिरापतीच्या रंगात रंगणारा भोंडला, आपल्या संस्कृतीचं संचित असलेल्या या सणावारांच्या निमित्ताने कुटुंबियांशी आणि शेजाèयांशी असलेले स्नेहबंध आणखी दृढ होतात.  
आजकाल सारं काही मुबलक आहे. फक्त फक्त एकाच गोष्टीची टंचाई आहे…वेळ. मटिरिअल गोष्टी अॅक्वायर करण्यासाठीच सगळा वेळ खर्ची पडतो. मग क्वालिटी टाईमवर चर्चा झडतात. तेव्हा नातेवाईकांबरोबर, शेजाèयापाजाèयांबरोबर घालवलेला, सणावारात साजरा केलेला, आजूबाजूच्या गँगसोबत मनसोक्त लुटलेला, मैत्रिणींना सीक्रेट्स सांगताना-ऐकतानाचा वेळ म्हणजेच तर क्वालिटी टाईम होता. त्यात होतं कौन्सेलिंग, मेंटॉरशिप आणि शेअरिंग. असं कुटुंब, असा सख्खा शेजार मिळाला की नाळही जुळते आणि नातंही! 
शेजारधर्माचा हा अमूल्य वारसा जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवा…. !!

 
 
Site Address : Gavtale Village, Dapoli – Khed Road, Near Vakavali Village, Tal : Dapoli, Dist : Ratnagiri.
MAHARERA: P52800018472